Home About Anubhav युनिक फीचर्स विषयी.. About Unique Features Photo Gallery अनुभवचे अंक अनुभवचं वर्गणीदार व्हायचंय..

About Anubhav
युनिक फीचर्स विषयी..
About Unique Features
Photo Gallery
अनुभवचे अंक
अनुभवचं वर्गणीदार व्हायचंय..

 

 

अनुभव विषयी...

"अनुभव'हे "युनिक फीचर्स'मार्फत प्रकाशित होणारं मासिक. वृत्तपत्रांचं बदलतं स्वरूप, नियतकालिकांच्या आशयात आलेला पाताळपणा आणि सजग वाचकांसाठी चांगलं माध्यमच न उरणं या पार्श्वभूमीवर "अनुभव'चं प्रकाशन सुरू केलं गेलं. आज घडीला "अनुभव' हे मराठीतील अव्वल क्रमांकाचं निमगंभीर मासिक बनलं आहे... आपला भवताल समजून घेण्याचं माध्यम बनलं आहे. "अनुभव'मध्ये हाताळले जाणारे विषय, घटना-घडामोडींकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि नवे लेखक-की-पत्रकार हुडकून त्यांच्याकडून चांगलंचुंगलं लिहून घेण्याचा प्रयत्न यांमुळे "अनुभव'चा दबदबा वाढत आहे.
"अनुभव'मधील लेखांबाबत कुठेकुठे चर्चा होणं, अंकातील लेखांचं जाहीर वाचन होणं, अंकातील लेख
आवडून अन्य नियतकालिकांनी ते स्वतःहून प्रसिद्ध करणं, परदेशातल्या मराठी रेडिओवर "अनुभव'मधल्या लेखांचं वाचन होणं इथपासून ते विधानपरिषदेतील चर्चेत "अनुभव'च्या अंकातील अभ्यासपूर्ण लेखाचा उल्लेख होणं अशा अनेक अंगांनी "अनुभव'चपरिघ विस्तारत आहे.
वाचकांचा परिघ आणखी विस्तारावा याच हेतूने "अनुभव'ने ही वेबसाईट सुरू केली. देश-विदेशातील सायबर वाचकांना "अनुभव' नियमितपणे वाचण्याचा आनंद त्यामुळे मिळू शकणार आहे. या प्रयत्नांला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.

दैनिकांच्या गर्दीत, चॅनेल्सच्या भाऊगर्दीत आणि चटपटीत साप्ताहिकांमध्ये चांगल्या वाचकाला खरोखर वाचायला किती मिळतं? "अनुभव' मध्ये मात्र प्रत्येक पान वाचकासाठी असतं. वाचकाचं अनुभवविश्व विस्तारावं, नव्या जगाचं भान त्याला यावं यासाठी खास प्रयत्न केला जातो. वाचकाला जे हवं आहे त्याचा पुरवठा करण्याच्या आजच्या जमान्यात "अनुभव' मात्र वाचकाला विविध विषयात मुशाफिरी करायला घेऊन जातो.

आमच्या या साऱ्या प्रयत्नांना दाद देणारा एक पुरस्कार "अनुभव'ला मिळाला. एकेकाळी महाराष्ट्रात नवविचारांचं वारं फिरवणाऱ्या शं.वा.किर्लोस्कर यांच्या नावाने दिला जाणारा "शंवाकि पुरस्कार' मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या हस्ते "अनुभव'ला दिला गेला आहे.  "तुमच्या लेखक-वाचकांना तुमच्याबद्दल प्रेम आहेच, पण साऱ्या महाराष्ट्राला आज तुमच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटतो," अशा शब्दात मुकुंदराव किर्लोस्कर यांनी "अनुभव'बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

"अनुभव' हे जाहिरातीचं माध्यम म्हणून वापरणाऱ्या आमच्या जाहिरातदारांना आम्ही त्यांच्यासाठी उपयुक्त अशा काही योजना विनामोबदला राबवतो. वाचकांना चांगल्या मजकुराबरोबरच नामवंतांच्या जाहिराती पहायला मिळतात आणि जाहिरातदारांना मिळतो मराठीतला एलिट क्लास. या साऱ्या प्रयत्नांमुळेच "अनुभव' बनलंय सर्वाधिक खपाचं निमगंभीर वाचनीय मासिक. आणि म्हणून अनेक लोकप्रिय ब्रॅन्डस्‌ अनुभवमध्ये आवर्जून जाहिरात करतात.

"युनिक फीचर्स'ने लावलेलं "अनुभव'नावाचं रोपटं आता मोठं झालं आहे नि बहरू लागलं आहे, याच्या या साऱ्या खाणाखुणा आहेत.

वाचनसंस्कृती संवर्धनासाठी..
महाराष्ट्रातील छोट्या शहरांतील व खेड्यापाड्यातील प्रतिभावान लेखक-कवी-पत्रकारांना हुडकून "अनुभव' मार्फत मराठी वाचकांसमोर आणलं जातं. खेड्यापाड्यातील ग्रंथालयं-वाचनालयं-कॉलेजेसना "अनुभव'चा अंक भेट पाठवले जातात. अनुभवचे वाचकही या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. "पाहिजेत चांगले वाचक' ही मोहिम महाराष्ट्रभर राबवली जाते. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन त्यांना वर्गणीदार करून घेतलं जातं.

एक चळवळ.. जे चांगलं ते लिहितं करण्यासाठी..!
जग बदलतंय. आपला भवतालही वेगाने बदलतोय. या बदलांकडे जरा शांतपणे पाहिलं तर भोवंडून जावं अशी परिस्थिती आहे.

आपल्या समाजात टोकाच्या घटना घडत आहेत. गेल्या काही वर्षात एका वर्गाचे दिवस पालटून गेले आहेत. देशाच्या नव्या अर्थव्यवस्थेचे भरघोस फायदे त्यांना मिळताहेत. त्यातून सुबत्ता, स्थैर्य आलंय. सुखाचा शोध चालू आहे. खिशातल्या पैशाचं काय करू नि काय नको, अशी अनेकांची अवस्था झालीय. पण त्याचवेळेस अनेकजण अस्वस्थ आहेत. त्यांना काहीतरी हरवल्यासारखं वाटतंय. गुदमरल्यासारखं वाटतंय. कामाचं स्वरूप, बदलती जीवनशैली, त्यातून निर्माण होणारे ताण, बदलती कुटुंबं, बदलते नातेसंबंध, अशा अनेक कारणांमुळे माणसांमध्ये चलबिचल आहे. एक ना अनेक कारणांमुळे आपल्या मुळांपासून उखडल्याची जाणीव त्यांना होतेय... आपल्या समाजाबद्दल, त्याच्या बथ्थडपणाबद्दल अनेकजण उद्विग्न झालेत. पण चिडचिड करण्यापलीकडे कुणाला मार्ग सापडत नाहीये. आपण निघालोय खरे, पण पलिकडचं टोक दिसत नाही अशी अवस्था निर्माण झालीय... संवेदनशील माणसांबाबत असं काहीबाही होतंय!

दुसरीकडे, एक मोठा वर्ग विपन्नावस्थेत जगतोय. त्याची आहे नाही ती जगण्याची साधनं हिसकावून घेतली जात आहेत. नव्या अर्थव्यवस्थेत एकतर त्याला स्थान नाही किंवा फुटकळ कामांवर जगण्याची त्याच्यावर सक्ती आहे. छोटा कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कारागीर, बाराबलुतेदार, असंघटित क्षेत्रातील कामगार वगैरे लोक कशाबशा जगण्याच्या नि टिकून राहण्याच्या मागे आहेत. आपलं काय होणार याची त्यांना चिंता लागून राहिली आहे. आपल्या पोराबाळांचं भवितव्य काय, या प्रश्नापर्यंत पोहोचण्यासाठी जेवढी उसंत लागते, तेवढीही त्यांच्या नशिबी नाही.
आपल्या सुखांकडे पाठ करून उभं राहिलं, तर असं काहीसं चित्र दिसतं. हे चित्र अस्वस्थ करणारं आहे. मनात खळबळ निर्माण करणारं आहे. ही खळबळ कागदावर उमटवायला हवी, असं आम्हाला वाटतं.
म्हणून "अनुभव'तर्फे तुम्हाला आवाहन केलं जात आहे की, लिहिते व्हा! आपली अस्वस्थता व्यक्त करा. "अनुभव'ला आपल्या भावनांचं नि विचारांचं व्यासपीठ बनवा. मराठीतल्या नव्या-जुन्या लेखकांना आमचं आवाहन आहे - वाटतंय ते मोकळेपणाने मांडा. आम्ही वाट पाहतोय.

संपर्क करा..
युनिक फीचर्स ऍण्ड न्यूज प्रा.लि.
8, अमित कॉम्प्लेक्स, 474, सदाशिव पेठ,टिळक रोड, पुणे - 411 030. फोन ः 24470896, 24486637
105, श्री प्रसन्न, कबुतरखान्याजवळ, भवानी शंकर रोड, दादर (प.), मुंबई - 400 028. फोन ः 24311398

asp hit counter
hidden hit counter

Contact Information

Telephone
020-24486637 / 24470896
Postal address
 
Electronic mail 8, Amit Complex, 474, Opp. New English School, Tilak Road, Sadashiv Peth, Pune 411 030.
eanubhav@eanuvhav.com & uniquefeatures@gmail.com

[ Home ] About Anubhav ] युनिक फीचर्स विषयी.. ] About Unique Features ] Photo Gallery ] अनुभवचे अंक ] अनुभवचं वर्गणीदार व्हायचंय.. ]

Send mail to eanubhav@eanubhav.com & uniquefeatures@gmail.com  with questions or comments about this web site.
Last modified: 06/03/09